मिठी

घट्ट मिठी न दुरावा कसला, 
थेंब पावसाचा त्यातही घुसला.
मिठी त्याने सैल थोडी केली,
हळवी मने मग एकमेकांत रुजली. 


दुष्काळाची

पिक उनाचं लैच दाट,
उसवलं धर्तीचा प्वाट,
चौकड उडतुया फुफाटा,
भरली दुष्काळाची जत्रा जोरात,
बोला दुष्काळाच्या नावानं . . . . . . . .

उन्हाळा

उन्हाळा लागला की आठवणींचा मळा फुलायला लागतो. सुट्टी लागली की आपल्या घरी नसल्या तरी दुसऱ्याच्या शेळ्या राखायला जायचे. अचानक एवढया सगळ्यांचे attention मिळाल्याने शेळ्यांना पण कदाचित heroin झाल्यासारखे वाटत असेल. शेळ्यांच्या निम्मित्ताने बराच काही साधून जायच. सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत अगदी राना वनात बोंबलत फिरायची अधिकृत परवानगी मिळायाची. कोणाच्या आंब्याला पाड लागला हे पहाण्यासाठी पाखरांनी काढलेली टोकर शोधायची. कुठे कोणाच्या बोरीला जाऊन काट्यात हाथ घालून तर कधी दगड मारून बोरं गोळा करायची.
वरच्या मळ्यातल्या विहिरीत पाणी आगदी तळाला असायचे किंवा नसायचेच म्हणून खालच्या मळ्यात अगदी वडयाजवळच्या विहिरीत परूसभर पाण्यात का होईना पण पोहायचे. तलावाच्या पट्टीच्या खाली चिंचेवर हमखास एखादे म्हव सापडायच मग धाडस करून ते उठवायचे मिळेल तेवढा मध चाखायचा. दुपारी आंब्याच्याखाली भाकरी, मिरचा, चटणी, कांदा . . . लिहिताना तोंडाला पाणी सुटल. झोपाळे, सूर पारंब्या चे डाव IPL पेक्षा जोरात चालायचे. सारं अनुभव आठवून AC मधल्या उन्हाळ्याचे चटके लागायला लागलेना राव.

दादया

गार हाय . . . गोड हाय … गार हाय . . . गोड हाय . . .लालेलाल . . . लालेलाल . . . लालेलाल
दादया आमच्या पंचक्रोशीतला त्या काळतला एकमेव गारीगार विकणारा. मी पहिली पासून दहावी पर्यंत म्हणजे १० वर्ष त्याच्यात काहीच बदल दिसला नाही. शरीराने किरकोळ, केसांचा मिथुन कट, डगळा लांबट शर्ट आणी मुडपलेल्या भाया , तीच सायकल, आणी तीच आरोळी . . . . अगदी लहान असताना जुने अल्युमिनियम चे १० किंवा २० पैसे असले कि गारीगार मिळून जायचे पुढे तेच २५ पैसे ५० पैसे आणि २ रुपये झाले, आत्ता कितीला मिळते ते माहित नाही. आता बाजारात आलेले Magnum जवळपास १०० रुपयांना मिळते हे जर दादयाला समजले तर त्याची प्रतिक्रिया काय असेल बरं. . . आयोव शंभर रुपय? येवडयाच गारीगार घेणार कोण?
मला सांगा गारीगार खाऊन झाल्यावर त्याची कांडी कोणी चघळली आहे का? सर्वांना नका सांगू पण आठवून बघा त्याची चव
Magnum किंवा Baskins & Robbins पण झक मरेल. आम्ही त्या कांड्या जमा पण करायचो त्याचं मातीत रोवून घर बनवायला मज्जा यायची. जत्रा, सप्ताह, कुस्त्या, बैलगाडी शर्यत अश्या ठिकाणी दादया दिसणार नाही असे होणारच नाही. पण या ठिकाणी दुसरे पण प्याप्सी, आयस्क्रीम वाले यायचे. जर चवीत बदल म्हणून आपण दुसरे काही घेतले तर काही दिवसांनी दादया त्याची आठवण नक्की करून दयायचा. कधी मध्ये मिळणारी सूट व जास्त वितळलेले फुकट मिळणारे गारीगार बंद होते कि काय याची भीती मनात येऊन जायची. नेहमीच्या गिर्हाईकावर तो एक अघोषित अधिकारच म्हणायचा. पुढे गाव सोडले आणी इतर अनेक लोकांसारखे दादया पण नजरेआड राहू लागला. सुट्टीत गेलो की कधी कधी दादया दिसायचा तो पण Upgraded सायकलची जागा M80 मोटारसायकलने घेतली होती पण बाकी सगळे तेच. यंदाच्या उन्हाळ्यात कुठे गारीगार मिळते का बघतोच.
न गुंतावे, न गुंतवावे.
गुंते सोडवता,
पुन्हा गुंतत न जावे.
- विक्रम ढेंबरे
आधी लिहायचे,
मग तसे वागायचे.
शब्दात जगायची सवय होताच,
मग शब्दांनाही फसवायचे.
जसे आपणास जगायचे, 
तसे आधीच लिहायचे.
- विक्रम ढेंबरे
रात्रीच्या पलीकडे  कालचा उजेड,
आजूनही थोडा उरला आहे, 
थोडा मंद थोडा फिका,
काहीसा नावापुरता उरला आहे. 
दिसताहेत काही पुसट हालचाली,  
काही पुरत्याच पुसल्या आहेत. 
काही सावल्या अजूनही 
अस्तित्वासाठी झटत आहेत. 

- विक्रम ढेंबरे 

ओलावा रुजला

थेंब पावसाचा . . . 
बरसण्याची जागा चुकला. 
व्हायचे होते समुद्र त्याला, 
वाळवंटात जाऊन सुकला. 
समुद्रदेखील मग . . . 
त्या वाळवंणटावर हसला. 
चुकूनच का होईना तुझ्यात 
आज ओलावा बघ रुजला.
- विक्रम ढेंबरे

मैत्री म्हणजे अनेक गोष्टी साध्य करण्यासाठी केलेली सोय असते

अनेकदा मैत्री म्हणजे अनेक गोष्टी साध्य करण्यासाठी केलेली सोय असते. मित्र म्हणजे एक दुभत जनावर जे निमुटपणे दुध देत जाते पण त्याला माहीतच नसते की ज्या दिवशी दुध बंद होईल तेव्हा त्याची किंमत शुन्य असणार आहे. आणी मग त्याच्याकडे होऊन गेलेल्या सर्व गोष्टींवर पश्चाताप करण्यापुढे काहीच उरत नाही. 
समाजात दोन प्रकारचे मित्र असतात त्यातला एक असतो तो मैत्रीकडे खूप आदराने पाहतो, मैत्रीत सगळ काही देऊ करतो तर दुसरा असतो तो फक्त आणि फक्त फायदा काढून घेण्यात मग्न असतो, त्याला भावनांची कदर असेलच आसे नाही. जेव्हा या नात्यात दुरावा निर्माण होत जातो तेव्हा एक मित्र आगदी शांत होऊन आपल्या वाटेने निघून जातो एकही प्रश्न न विचारता आणी दुसरा मात्र त्याला मागून पुन्हा पुन्हा प्रश्न विचारात आसतो की तू का जातो आहेस? का जातो आहेस? पण त्याने जर तोच प्रश्न एकदा स्वःताला विचारला तर उत्तर नक्कीच मिळेल की जाणारा नक्की का जातोय?

नाते जोडताना स्वार्थ बाजूला ठेवावा, असे प्रेत्येकालाच वाटते.
नाते अतूट असावे कधीच न तुटावे, असे प्रेत्येकालाच वाटते,
पण. . असे वाटणाऱ्या अनेकांना, फक्त असे वाटतच राहते.

शब्दांच वादळ

शब्दांच वादळ उठलं आहे शिरात.
लेखणीला भय वाटू लागले आहे.